क्राइम ऑपरेशनच्या स्टिंग ऑपरेशननंतर गिट्टीखदान परिसरातील सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड; 16 आरोपींवर कारवाई
क्राइम ऑपरेशन-29 मई 2026
नागपूर शहरातील नागपुर शहर पोलीस यांच्या गुन्हेशाखा युनिट क्रमांक 02 ने गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या सट्टापट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई क्राइम ऑपरेशनने केलेल्या स्टिंग ऑपरेशन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक 27 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सट्टापट्टीची खायवाडी करणाऱ्या 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून केशव चौधरी (वय 25 वर्ष, रा. सुरेंद्रगड) याचे नाव समोर आले असून इतर 15 आरोपींचाही समावेश आहे.

गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध अप. क्र. 376/2026 अन्वये कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून सट्ट्याच्या आकड्यांच्या 34 कागदी पट्ट्या, 10 पेन, 05 मोबाईल, 08 कॅल्क्युलेटर, सट्ट्याचे आकडे लिहिलेले दोन बोर्ड तसेच आरोपींकडून 10 हजार 270 रुपयांची रोकड असा एकूण 55 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. आरोपी लोकांकडून पैसे घेऊन सट्ट्याच्या आकड्यांवर पैशांची बाजी लावत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंचांसमक्ष जप्तीची कारवाई करून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

सदर कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध सट्टा व्यवसायावर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
