नागपुरात पत्रकारितावर्तुळात भूकंप!
क्राईम रिपोर्टरवर भ्रष्टाचार, वसुली आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे आरोप; ED-CBI पर्यंत तक्रार
क्राइम ऑपरेशन-१९ मई २०२६
मुख्यमंत्री ते ED पर्यंत धाव; टिळक पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोपांचा स्फोट
नागपूर – शहरातील पत्रकारितावर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून एका नामांकित क्राईम रिपोर्टरविरोधात भ्रष्टाचार, अवैध वसुली आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री, गृह विभाग, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, नागपूर पोलीस आयुक्त, CBI, ED आणि आयकर विभागापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले आहे.
टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत “WE THE PEOPLE” संस्थेचे ट्रस्टी प्रमोद भगचंदानी यांनी हा आरोपांचा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, संबंधित पत्रकाराने आपल्या अधिकृत उत्पन्नापेक्षा अनेक पटींनी अधिक मालमत्ता जमा केल्याचा संशय असून नागपूर शहरातील फ्लॅट, प्लॉट, बंगले, शेती जमीन आणि इतर गुंतवणुकींची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर काही व्यावसायिक संघटना आणि अवैध धंद्यांशी संबंधित व्यक्तींंकडून “मासिक वसुली” केल्याचाही गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. संबंधित पत्रकाराचे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी निकट संबंध असल्याचा दावा करत गोपनीय माहितीचा गैरवापर होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या आरोपांमुळे नागपूरच्या पत्रकारितावर्तुळात एकच खळबळ उडाली असून “नेमके कोणाचे संरक्षण सुरू आहे?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. अनेक स्तरांवर चर्चा सुरू असून आता तपास यंत्रणा या प्रकरणात कारवाई करणार की प्रकरण थंड बस्त्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांना अद्याप कोणत्याही सरकारी तपास यंत्रणेची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. संबंधित पत्रकार किंवा संस्थेकडूनही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. कायदे तज्ज्ञांच्या मते, कोणतेही आरोप तपास पूर्ण होईपर्यंत सिद्ध मानले जाऊ शकत नाहीत आणि संबंधित व्यक्तीस आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

“खाकी आणि पत्रकारितेच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह?”
या प्रकरणानंतर नागपूरात पत्रकार, पोलीस आणि अवैध धंद्यांच्या कथित संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, “सत्य बाहेर येणार का?” हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
